काय आहे हा इबोला ?
इबोला हा एक विषाणूजन्य आजार आहे. इबोलाचा हा विषाणू हा आज मानवी जगाला ज्ञात असलेला सर्वाधिक घातक विषाणू आहे. इव्हीडी अर्थात इबोला व्हायरस डिसीज पूर्वी हाइमॉरहॉजिक फिवर म्हणून ओळखला जायचा. या आजारातील मृत्यूचे प्रमाण ५० ते ९० टक्के इतके प्रचंड आहे.आज सुरू असलेला इबोलाचा उद्रेक हा डिसेंबर २०१३ पासून सुरू झाला आहे. गिनी, सिएरा लिओन, लायबेरिया आणि नायजेरिया या चार देशांसोबत आता कांगोमध्येही हा उद्रेक सुरू आहे. २८ ऑगस्ट २०१४ पर्यंत या देशांमध्ये ३०६९ इबोला रुग्ण आढळले असून त्यापैकी १५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने या आजवरच्या सर्वात मोठय़ा इबोला उद्रेकात मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे ५३ टक्क्य़ांच्या आसपास आहे. गिनीमध्ये ते ६६ टक्के आहे तर सिएरा लिओन मध्ये ४२ टक्के आहे.
इबोला हा फिलोव्हिरिडी कुळातल्या 3 सदस्यांपैकी एक सदस्य असून याच्या 5 प्रजाती आहे.
- बुंदीबुग्यो
- झायरे
- रेस्टॉन
- सुदान
- ताय फॉरेस्ट.
कसा पसरतो
- चिम्पांझी, गोरिला, माकडे, जंगली हरिणे अशा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या रक्ताशी, अवयवांशी, लाळेशी, मलमूत्र किंवा शरीरातून होणाऱ्या अन्य स्रावांशी संपर्क आल्यास हा रोग मानवांमध्ये पसरतो.
- संसर्ग झालेल्या माणसाच्या रक्ताशी, लाळेशी, मलमूत्र आदी शारीरिक स्रावांशी संपर्क झाल्यास, व्रण उमटलेल्या त्वचेशी थेट स्पर्श झाल्यास या रोगाची लागण होऊ शकते.
लक्षणे
- ताप, कमालीचा थकवा, सांधेदुखी, डोकेदुखी, घसा सुजणे, उलटया, जुलाब, पुरळ, मूत्रपिंड आणि यकृताच्या कामावर परिणाम आणि काही वेळेस अंतर्गत व बाहय रक्तस्राव
- प्रयोगशाळांमधल्या नमून्या पांढऱ्या पेशी आण प्लेटलेटसची संख्या कमी झाल्याचेही आढळून आले आहे.
- इबोला विषाणूचा शरीरात प्रवेश, त्याची वाढ व लक्षणे दिसण्यापर्यंतचा कालावधी 2 ते 21 दिवस असतो.
निदान
निदानासाठी चाचण्या
- अँटी बॉडी कॅप्चर एनझाइम लिंकड इम्युनोसॉरबंट अॅसे (एलिसा)
- अँटीजेन डिटेक्शन चाचणी
- सिरम न्यूट्रलायझेशनरिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेझ पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (आरटी- पीसीआर) अॅसे
- इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी
- सेल कल्चरच्या मदतीने विषाणू वेगळा करणे
प्रतिबंध आणि नियंत्रण
- इबोलाची लागण न झालेल्या व्यक्तींबरोबर सार्वजनिक ठिकाणी वावरण्यात कोणताही धोका नाही. पैशांची, सामानाची देवाण-घेवाण यांच्या माध्यमातून इबोलाची लागण होत नाही. स्विमिंग पूलामधूनही या रोगाची लागण होत नाही. डासापासून इबोलाचा फैलाव होत नाही.
- इबोलाचा विषाणू साबण, ब्लिच, सूर्यप्रकाश यामुळे सहज मरतो. सुर्यप्रकाशामुळे कोरडया झालेल्या पृष्ठभागावर इबोलाचा विषाणू काही क्षणच जिवंत राहू शकतो.
- इबोलावर अजूनही प्रभावी उपचार पध्दती किंवा मानवी लस उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची लागण न होणे हाच त्यापासून बचाव करण्याचा उपाय आहे.
- माकडे आणि इतर जंगली प्राण्यांशी संपर्क टाळला पाहिजे. त्यांचे कच्चे मांस खाऊ नये. प्राण्यांना ग्लोवज घालून तसेच इतर संरक्षक आवरणे शरीरावर चढवून हाताळणे. प्राणीज पदार्थ (रक्त आणि मांस) पूर्णपणे व्यवस्थित शिजवूनच खावेत.
- इबोलाची लागण झालेल्या रुग्णाशी थेट शारीरिक संपर्क टाळावा. अशा रुग्णाची काळजी घेताना संरक्षक साधनसामग्री शरीरावर चढवावी आणि जैवसुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्याची विल्हेवाट लावावी. रुग्णाची सेवा केल्यानंतर, रुग्णालयात जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुवावे.
- मृत रुग्णावरचे अंत्यसंस्कार जैवसुरक्षेची काळजी घेऊन करावेत.
- इबोला रुग्णाच्या रक्ताशी आणि इतर स्रावाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे इबोलाची लागण होऊ शकते. याचा सर्वाधिक धोका वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना असतो.
- प्रत्येक वेळेस इबोलाचे तात्काळ निदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सर्वच रुग्णांबाबत प्रमाणित प्रतिबंधात्मक दक्षता बाळगणे क्रमप्राप्त ठरते.
- प्राथमिक स्वच्छता व काळजी, श्वसन यंत्रणेच्या बचावाची काळजी, संरक्षण साधनसामग्रीचा वापर, इंजेक्शन देताना घ्यावयाची काळजी, संसर्ग झालेल्या मृत रुग्णाची हाताळणी याबाबत दक्षता घ्यावी.
- रुग्णापासून एक मीटरच्या आत संपर्क येणाऱ्या व्यक्तीने मेडिकल मास्क व गॉगल्स चढवणे आवश्यक आहे. तसेच लांब बाहयांचा गाऊन आणि ग्लोव्हज घालणेही आवश्यक आहे.
- प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही धोका असल्यामुळे संशयित नमुने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी आणि सुसज्ज अद्ययावत प्रयोगशाळेतच तपासले जाणे आवश्यक ठरते.
इतर माहिती
- इबोलाची पहिली साथ १९७६ साली झैरे (कांगो) या देशातील 'यांबुकु' या इबोला नदीच्या काठी वसलेल्या गावात सुरु झाली .
- इबोला नदीवरून या नव्या विषाणूचे बारसे 'इबोला विषाणू' असे करण्यात आले.
- इबोलाची साथ मार्च २०१४ ला गिनीमध्ये सुरू झाली.
No comments:
Post a Comment