महत्वाच्या पोस्ट

'जीवन अमृत सेवा' (ब्लड ऑन कॉल) योजना

महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना रक्त आता हाकेच्या अंतरावर- मुख्यमंत्री

Blood on Call


प्रगत तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मात्र अजूनही रक्त असा एक घटक आहे जो कृत्रिमरित्या तयार करण्यात यश मिळाले नाही. मानवी जीवनातील रक्ताचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने 'जीवन अमृत सेवा' (ब्लड ऑन कॉल) ही लोकाभिमुख योजना आजपासून राज्यभरात सुरु केली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना एका फोन कॉलवर हाकेच्या अंतरावरच रक्त मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

गरजू रुग्णांना वेळेवर आणि शासकीय शुल्कात रक्त उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाची जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) योजना आजपासून राज्यभरात सुरू करण्यात आली. त्याचा शुभारंभ समारंभ मुंबईतील जे.जे.महानगर रक्तपेढीमध्ये झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. तर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री फौजिया खान, आमदार सर्वश्री मधू चव्हाण, अमीन पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील सामान्य नागरिकांना निरोगी आरोग्य लाभावे यासाठी अनेक अभिनव योजना सुरु केल्या आहेत. राजीव गांधी जीवनादायी आरोग्य योजनेच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर ही योजना संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे सामान्यांना गंभीर आजारांवर मोफत उपचार करुन घेणे सहज शक्य झाले आहे. या योजनेपाठोपाठ अजून एक लोकाभिमुख योजना आम्ही आजपासून राज्यातील जनतेला अर्पण करीत आहोत. 104 या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास तासाभरात गरजू रुग्णाला रुग्णालयात रक्त उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु केली आहे. सामान्यांना दिलासा देणारा हा उपक्रम असून त्याबरोबरच येत्या जानेवारी अखेरीस आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) सुरु करण्यात येणार आहे. या योजनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या सहाय्याने गरजूंना पहिल्या सुवर्ण तासात आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यात लोकाभिमुख आरोग्य सेवा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून या सर्व महत्वाकांक्षी योजनांबरोबरच लवकरच राज्यात ग्रामीण भागातील जनतेला मोफत औषधे देण्याची योजना केंद्र सरकारच्या सहाय्याने राबविली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांनी केली.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या सामान्य जनतेला दर्जेदार व गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा मिळावी यासाठी विविध आरोग्य सेवांचा विस्तार करताना निधीची कमतरता जाणवू दिली जाणार नाही. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सुरु करण्यात आलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, आजपासून सुरु झालेली जीवन अमृत सेवा योजना आणि लवकरच सुरु करण्यात येणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांमुळे सामान्य नागरिकांना निरोगी जीवन प्रदान करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे 940 रुग्णवाहिकांचा समावेश असलेली आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरु करण्यात येत आहे. 108 क्रमांकावर संपर्क साधल्यास तातडीने अत्याधुनिक रुग्णवाहिका मदतीला येणार आहे. अशा महत्वाकांक्षी योजनांसोबतच राज्यात 10 ठिकाणी मेट्रो ब्लड बँक सुरु करण्याचे काम प्रगती पथावर आहे. रक्तपेढ्यांच्या कामात गुणात्मक वाढ व्हावी यासाठी त्यांच्या आधुनिकीकरणाला लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे. एका फोन कॉलवर रक्त उपलब्ध करुन देणारी योजना देशात सर्वप्रथम सुरु करण्याचा मान महाराष्ट्राने मिळविला आहे. गरजू रुग्णांना दर्जेदार आणि शासकीय किंमतीत पाहिजे त्या ठिकाणी रक्त उपलब्ध करून देणारी जीवन अमृत सेवा ही अभिनव योजना आहे. 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास साधारणता एक तासाच्या आत मोटरसायकलच्या माध्यमातून शीतसाखळीद्वारे रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये राज्यातील खासगी नर्सिंग होम आणि रुग्णालयांनी सहभागी व्हावे. जे खासगी रुग्णालये रुग्णांना एका विशिष्ट रक्तपेढीकडूनच रक्त घेण्याची सक्ती करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान म्हणाल्या की, आरोग्य विभागाने विविध सेवांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करुन पारदर्शकता जपली आहे. त्यामुळे सामान्यांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्वक आरोग्य सुविधा आणि सेवा उपलब्ध होण्यास मदत होत आहे. आरोग्य विभागाने सुरु केलेल्या योजनांमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्वाधिक जास्त रक्त संकलन करणाऱ्या दहा संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ.संजय जाधव यांनी आभार मानले.

Source: 'महान्यूज' 

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.