महत्वाच्या पोस्ट

एक हजार दिवसांचा पंचसूत्री कार्यक्रम

हजार दिवस बाळाचे…


Hajar Divas Balache yojana

राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी एक हजार दिवसांचा पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. कुपोषणाचे प्रमाण 50 टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट या कार्यक्रमांतर्गत निश्चित करण्यात आले आहे. माता आणि बालकाच्या आरोग्याची काळजी घेऊन सशक्त पिढी निर्माण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

एक हजार दिवस बाळंतपणाचा नऊ महिन्याचा कालावधी आणि बालकाच्या वृद्धीसाठी अत्यंत महत्वाचे असलेले पहिले दोन वर्ष याचे निर्देशक आहे. महिला व बालविकास विभागाचे यादृष्टीने पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना गती देण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे.

किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे हा कार्यक्रमातील महत्वाचा भाग आहे. मुलींमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण 52 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या योजना राज्याच्या प्रत्येक भागात प्रभाविपणे पोहोचविल्या जाणार आहेत. जिवनकौशल्यावर आधारीत साप्ताहिक कार्यक्रम आणि लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि एकात्मिक बालविकास योजना संयुक्तपणे हा उपक्रम राबविणार आहेत.
जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करण्यावरही भर देण्यात येणार आहे. सीएनएसएमच्या अहवालात हे प्रमाण 20 टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते 10 टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गर्भवती महिलेच्या वजनाची योग्यप्रकारे नोंद घेणे, लोहयुक्त गोळ्याचे वाटप आणि माता-बाल संगोपनाच्या प्रभावी पद्धतीचा उपयोग करण्याच्या माध्यमातून बालकांचे वजन कमी असणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

जन्मानंतर स्तनपानाची सुरूवात झाल्यास बालकाला कुपोषणापासून वाचविता येते. मुल जन्मल्यानंतर एक तासाच्या आत त्याला मातेचे दूध मिळणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे बालकाला सहा महिन्यापर्यंत मातेचे दूध मिळणे आवश्यक आहे. सीएलएसएमच्या अहवालानुसार अशा स्वरुपाच्या स्तनपानाचे प्रमाण केवळ 62 टक्के आहे. ते पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत 80 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात जिल्हा क्षेत्रीभेटीचा कार्यक्रमही राबविण्यात येत आहे.

बाळास सहा महिने पूर्ण झाल्यावर स्तनपानाबरोबर पूरक आहार सुरू करणे आणि आहाराची गुणवत्ता वाढविणे तेवढेच महत्वाचे आहे. बाळाला 6 ते 24 महिन्याच्या वयात मातेच्या दुधाबरोबरच विविध प्रकारचा पूरक आहार देणे गरजेचे असते. पूरक आहारातील विविधतेचे प्रमाण केवळ 10 टक्के आढळून आले आहे. त्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे प्रयत्न या कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.
कुपोषित बालकांचे व्यवस्थापन हेदेखील या कार्यक्रमातील महत्वाचे सूत्र आहे. आंतरराष्ट्रीय संहितेप्रमाणे हे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. त्याद्वारे कुपोषित बालकांचे मृत्युचे प्रमाण कमी करता येईल.

देशाला मजबूत करण्यासाठी उद्याची पिढी सशक्त असणे गरजेचे आहे. बाळाच्या योग्य पोषणावर लक्ष दिल्यास त्याला अनेक आजारांपासून दूर ठेवणे शक्य होईल आणि शिवाय त्याच्या शरीराची योग्य जडणघडण होऊ शकेल. त्यासाठी बालकाच्या आणि मातेच्या पोषणाविषयी माहिती करून घेणे गरजेचे आहे. ‘बाळाच्या हजार दिवसात’ पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती करून घेतल्यास आणि त्याच्या पोषणाकडे लक्ष दिल्यास निर्धारीत केलेले उद्दीष्ट गाठणे सहज शक्य आहे.

Source: 'महान्यूज'

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.