महत्वाच्या पोस्ट

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI)

Maharashtra Engineering Research Institute (MERI)


Maharashtra Engineering Research Institute (MERI)
Maharashtra Engineering Research Institute (MERI)

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI) राज्यस्तरावर काम करणारी राज्यातील एकमेव संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना 1959 साली नाशिक येथे करण्यात आली. महासंचालक (डीटीएचआरएस) हे या संस्थेचे प्रमुख असून त्यांच्या अखत्यारित मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सीडीओ-डी), महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेटा-टी), नियोजन आणि जलविज्ञान (एच), महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (आर), धरण सुरक्षितता संघटना (एस), गुणनियंत्रण मंडळे (क्युसी), राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती (टॅक) आदी विभाग कार्यरत आहेत.

या संस्थेमध्ये जलविज्ञान, महामार्ग, पर्यावरण, संरचनात्मक अभियांत्रिकी उपकरणे, मृदा अभियांत्रिकी, पदार्थ चाचणी, भूकंप पृथ:करण तसेच सुदूर संवेदन व भू माहितीशास्त्र क्षेत्रात संशोधन केले जाते. या संस्थेत एकूण 8 विभाग असून ते अधीक्षक अभियंता व सहसंचालक यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत. या संस्थेत सुदूर संवेदन तंत्राच्या साहाय्याने पीकक्षेत्र मोजणी व धरणातील गाळ सर्वेक्षण करणे, भूकंप लहरींविषयीची माहिती संकलित करून त्याचे पृथ:करण करणे, धरणाचा सांडवा, कालवे अशा भागांची प्रतिरूपे तयार करून त्याचे परीक्षण करणे, धरणांवर वेगवेगळी उपकरणे बसविणे, रस्त्यांचे परीक्षण करणे, सिमेंट, वाळू, खडी, लोह इ. बांधकाम साहित्याच्या चाचण्या करणे, प्लेट लोड टेस्ट, काँक्रीट मिक्स डिझाइन इ. यांचे परीक्षण करणे अशी कामे करण्यात येतात.

मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (Central Designs Organization)


मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेची स्थापना 1959 मध्ये मुंबईत झाली. संशोधन कार्यासोबत ताळमेळ करण्यासाठी ही संस्था 1976-77 साली नाशिक येथे स्थलांतरीत करण्यात आली. या संस्थेत चार अधीक्षक अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली 17 कार्यकारी अभियंते दगडी धरणे, माती धरण, विमोचक, विद्युत गृहे व उपसा सिंचन इ. संदर्भातल्या संकल्पनांचे काम करतात. या संस्थेत जलसंपदा विभागातील मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांचे मुख्य भागाचे संकल्पन करणे, माती धरण, दगडी धरण, कोलग्राऊट व आरसीसी धरणांचे व त्यांच्या विविध भागांचे संकल्पन करणे, सांडवा, बंधारे, विमोचके, वक्राकार विमोचके, कालवे इ. चे संकल्पन करणे, जलविद्युत गृहे व त्यांच्या भागांचे संकल्पन करणे, उपसा सिंचन योजनेचे संकल्पन, पाण्याचे नियोजन, पूर नियंत्रण, भूगर्भीय संशोधन इ. कामे करण्यात येतात.

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (Maharashtra Engineering Training Academy (META)


1964 साली नाशिक येथे स्थापन झालेल्या या संस्थेस सुरूवातीला स्टाफ कॉलेज या नावाने ओळखले जायचे. ही संस्था महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सरळ सेवा भरती मधील महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेच्या सहा. कार्यकारी अभियंता व सहा. अभियंता श्रेणी 1 (जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभाग) यांचे परीविक्षाधीन प्रशिक्षण घेते. तसेच सेवेत कार्यरत अभियंत्यांसाठी सुद्धा विविध प्रशिक्षण घेते. या संस्थेमार्फत उपअभियंता, शाखा अभियंता इ. च्या परीविक्षाधीन परीक्षा घेण्यात येतात. या संस्थेच्या 3 विभागीय कार्यालये असून ते पुणे, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत.

धरण सुरक्षितता संघटना (Dam Safety Organisation)


या मंडळाची स्थापना 1980 मध्ये नाशिक येथे झाली. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे धरणांना असणारे संभावित धोके ओळखणे व त्यावर उपाय सुचविणे होय. या संस्थेमार्फत धरणांचे मान्सून पूर्व व मान्सूनोत्तर परीक्षण करणे, त्याचे अहवाल तयार करणे व ते शासनास आणि संबंधित विभागास सादर करण्याचे काम केले जाते.

नियोजन आणि जलविज्ञान (Planning and Hydrology


राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत 1995 साली जलविज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेत दोन मंडळ कार्यालय व 8 विभागीय कार्यालय कार्यरत आहेत. ही संस्था प्रामुख्याने पाण्याविषयी माहिती संकलीत करून त्याचे पृथ:करण करते.

त्याचसोबत या संस्थेमार्फत हवामान विषयक उपकरणे उभारण्याचे व त्याची देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येते. पाणी गुणवत्ता तपासणीचे ही काम यामार्फत केले जाते. पाणी गुणवत्तेसाठी 37 विविध मापदंड तपासण्यात येतात, यासाठी स्तर दोनच्या 6 व स्तर एकच्या 6 प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

नद्यांचे खोरे निहाय माहिती संकलन, माहितीचे पृथ:करण, पाण्याचे नियोजन व पाणी उपलब्धता अभ्यास, 25 कोटी पेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता व सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे काम राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत करण्यात येते.

गुणनियंत्रण मंडळे (Quality Control


याअंतर्गत 3 मंडळ कार्यालये व 11 विभागीय कार्यालये कार्यरत आहेत. सदर मंडळ कार्यालये पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे आहेत. या संस्थेमार्फत प्रकल्प बांधकामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे, विविध बांधकाम साहित्याचे त्यांच्या मानकाप्रमाणे तपासणी करून गुणवत्ता चाचणी अहवाल तयार करणे, प्रकल्प स्थळावर मृदा व काँक्रीट यांच्या तपासणी चाचण्या करणे कामे केली जातात.

जलसंधारण व बांधकाम यांच्या संदर्भातील विविध स्तरावरील कामे, त्या कामांची गुणवत्ता व काम करतांना येणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या अडचणींवर उपाय शोधून त्यावर मार्गदर्शन करण्याचे काम या संपूर्ण 'मेरी' संस्थेकडून करण्यात येते.

(MPSC परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे हायलाइट केले आहेत.)


Source: 'महान्यूज'


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.