Tiger Census
Tiger Census |
समृद्ध पर्यावरणाचा प्रमुख आधार, जंगलाचा श्वास असलेल्या राजबिंड्या वाघाला वाचविणे ही काळाची गरज आहे. नाही तर जगातील वाघांच्या संख्येचा गेल्या शतकाचा उतरता आलेख पाहिला तर एक दिवस हा 'वाघ' पृथ्वीतलावरुन नाहीसा होईल. 'वाघ' संपला तर सृष्टीच्या विनाशाची ती सुरुवात ठरेल. सृष्टीच नाही तर सजीवसृष्टी नाही. 'मानव' हा सुद्धा संपलेला असेल. यासाठी प्रत्येकाने निसर्गाचा घटक समजून संबंध सजीवांचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला सन्मानाने वागविले पाहिजे. कारण या पृथ्वीतलावर राहण्याचा प्रत्येकाचा समान अधिकार आहे. आणि म्हणूनच 'वाघ' वाचविण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. तरच तुमचं, आमचं आणि संबंध सजीवसृष्टीचं भवितव्य उज्वल आहे.
“वाघ नाहीसा झाला तर तो निर्माण करणं माणसाच्या हाती नाही. नाहीसा झालेला वन्यप्राणी जन्माला यायचा म्हणजे एक आकाश जाऊन दुसरं जन्माला यावं लागते”.
दिनांक १७ जानेवारी पासून देशात राष्ट्रीय स्तरावर व्याघ्र गणना कार्यक्रमास सुरुवात झाली.
“वाघ” आणि व्याघ्र गणनेसंबंधी...
“वाघ!”.. डोळे दिपवणारं सौंदर्य. समोर आलेल्या वन्यप्राण्यांच्या काळजाचे पाणी-पाणी करणारी भेदक नजर. धाडसामध्यं आणि शौर्यामध्ये मागे न हटण्याचा स्वभावधर्म. त्या धर्माला साजेसे शक्तीशाली पंजे आणि डौलदार चाल ही जंगलाच्या राजाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच त्याला पाहण्याची आस प्रत्येक निसर्गप्रेमी, प्रत्येक पर्यटक बाळगून असतो. म्हणूनच आज देशातील अनेक जंगलं भटकंती करणाऱ्यांच्या गर्दीमुळं फुलू लागली आहेत.
“वाघ” हा जंगलातील वन्यजीवांच्या अन्नसाखळीतील प्रमुख स्थानी आहे. वाघ आहे म्हणून जंगल आहे. जंगल आहे म्हणून वाघ आहे. त्यातील वन्यजीव आहेत. तसंच जंगल आहे म्हणून शुद्ध ऑक्सीजन आहे. पाणी आहे. पाणी आहे म्हणून मानवासहीत संपूर्ण सजीवसृष्टी आहे. यामुळेच पर्यावरणाचा समतोल टिकून आहे. “वाघ” हा समृध्द पर्यावरणाचा आधार मानला जातो.
इतिहास
इ.सन.पूर्व ३०० मध्ये वन्यजीव रक्षणाची पहिली संकल्पना सम्राट चंद्रगुप्त मोर्य याने अंगिकारली. अभयारण्य निर्मितीचा तो पायाच म्हटला पाहिजे. अरण्याचे रक्षण आणि संवर्धन करण्यावर त्या काळात भर देण्यात आला. जंगल देखभालीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचे काम चंद्रगुप्ताने केले. परंतु त्यानंतरच्या काळात माणूस कधी स्वार्थापोटी म्हणजेच निवाऱ्यासाठी तर कधी शिकारीचा शौक भागविण्यासाठी जंगलतोड करतच राहिला. ब्रिटिशांनी जंगल संरक्षित केली पण त्यात शिकारीचा स्वार्थ होता. मात्र स्वातंत्र्य मिळविण्याच्या काही काळ अगोदर वन आणि वन्यजीवाबाबत जाणीव तयार होऊ लागली होती. स्वातंत्र्यानंतर या जाणिवेने चळवळीचे रुप घेतले. त्यासंबंधी कायदा तयार झाला. त्यातून जंगल आणि त्यातील वन्यजीवांना अभय मिळाले. आज भारतात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १७ टक्के क्षेत्र हे वनाच्छादित आहे. जंगलतोड किंवा शिकारीवर कायद्याने निर्बंध आणले असले तरी त्यात छूपे व्यवहार मात्र तेजीत आहेत.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १ लाख वाघ भारतात होते. “शिकार” हा काही लोकांसाठी छंद बनला, वाघांचे नैसर्गिक खाद्य कमी झाल्याने वाघांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले. त्यामुळे विष प्रयोग करुन वाघांच्या शिकारी करण्यात आल्या. १९७० च्या सुरुवातीस केवळ १७०० वाघ उरले. म्हणून भारत सरकार खळबळून जागे झाले आणि १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आला. वाघासह अनेक दुर्मिळ प्रजातीच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली व व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेस चालना मिळाली. भारतीय वाघांचे संरक्षण, त्यांच्या वसतीस्थानाचे संवर्धन व वाघांच्या संख्येत वाढ करणे या उद्येशाने भारतात व्याघ्र प्रकल्पांची स्थापना १९७३-७४ साली करण्यात आली. यामुळे वाघांची संख्या वाढली. परंतु चोरट्या शिकारींचा सुळसुळाट झाला व १९९० च्या दशकानंतर पुन्हा वाघांच्या शिकारीत वाढ झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे चीनमधील विविध प्रकारच्या औषधांसाठी वाघाच्या हाडांची मोठी मागणी वाढली. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही वाघांच्या शिकारींमध्ये चीनच्या धोरणात काहीही बदल झाला नाही. १९ व्या शतकातील १ लाख वाघांची संख्या २० व्या शतकात ४० हजारावर आली. तर चालू २१ व्या शतकाच्या प्रारंभी पृथ्वीतलावर अवघे ३५०० ते ४००० वाघ शिल्लक आहेत. भारतासाठी आशेचा एकमेव किरण म्हणजे आज जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी निम्मे वाघ आपल्या देशात आहेत. एनटीसीए तर्फे २०११ घेण्यात आलेल्या व्याघ्र गणनेत भारतात एकूण १७०६ वाघ असल्याचे सिद्ध झाले. ही संख्या व्याघ्रभूमि असलेल्या १७ राज्यातील ४१ व्याघ्र प्रकल्प आणि ६६३ अभयारण्यातील एकूण अंदाजे ५ लाख चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रात आहे.
गेल्या शंभर वर्षापासून कमी-कमी होत चाललेली वाघांची संख्या अत्यंत गंभीर विचार करायला लावणारी आहे. शंभर वर्षात जगात ९४ टक्के वाघांची शिकार करण्यात आली. भारतात १९९९ ते २०११ या अवघ्या बारा वर्षात ४४७ वाघांचा मृत्यू झाला तर त्यातील १९७ वाघांची शिकार करुन त्यांना ठार मारण्यात आले. काही वर्षापूर्वी जगातील ३५ देशांमध्ये असलेले वाघांचे वास्तव्य आता केवळ अवघ्या १३ देशांमध्येच राहिले आहे. हे भीषण वास्तव लक्षात आल्यामुळे वाघांच्या संख्येवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आणि त्यासाठी देशव्यापी व्याघ्र गणना हा कार्यक्रम जवळपास चाळीस वर्षापासून दर चार वर्षाने घेतला जातो.
वन्यप्राणी प्रगणनेच्या पद्धती
वन्यप्राणी प्रगणनेच्या एकूण चार पद्धती आहेत. पाणवठ्यावरील प्रगणना, भूखंड पद्धतीने वन्यप्राणी प्रगणना, प्लॅस्टर कास्ट व ट्रेसिंग पद्धत आणि कॅमेरा ट्रॅप पद्धतीने प्रगणना आणि वाघाच्या गणनेसाठी अंदाजे चाळीस वर्षापासून त्याच्या मागील डाव्या पायाच्या पंजाचे प्लॅस्टर कास्ट काढण्यात येत होते. वाघाचा वावर त्याच्या निर्धारित क्षेत्रातच असतो. रानवाटेवरुन किंवा पाणवठ्यांकडे जाणाऱ्या वाटेवरुन चालतांना आपले पदचिन्ह तो मागे सोडतो. सात दिवसाच्या व्याघ्र प्रगणनेत रोज सकाळी व सांजवेळेपूर्वी अरण्याच्या विविध क्षेत्रात फिरुन प्रथम पगमार्कचे “ट्रेसिंग” घेतल्या जायचे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या द्रावणातून वाघाच्या पाऊल ठशांचे प्लॅस्टर कास्ट काढले जायचे. तयार पाऊल ठशाचे व घेतलेल्या ट्रेसिंगचे विश्लेषण करण्यात येऊन त्यात बोटामधील अंतर, पंजाची गादी, बोटाचा आकार, त्याच्या गादीचा आकार व संपूर्ण पंजाचा आकार याचा विचार करण्यात येतो. बिबट व वाघाच्या पिल्लांचे “पगमार्क” सारखेच दिसतात. त्याचे विश्लेषण वेगळ्या पद्धतीने काटेकोरपणे करण्यात येते. वाघाच्या छाव्याबरोबर बहुधा मादी असते. तसेच पिल्लाची स्ट्राईड बिबटच्या स्ट्रॉईडपेक्षा कमी असते. तयार केलेल्या प्लॅस्टर कास्टवर दिनांक, वेळ, ठिकाण, जंगल परिक्षेत्राचे नाव इ.चा उल्लेख असतो. या सर्व काढलेल्या प्लॅस्टर कास्टच्या आणि ट्रेसिंगच्या विश्लेषणातून वाघांची एकूण संख्या काढली जाते. काही अरण्यात अजूनही हीच पद्धती व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाते.
कॅमेरा ट्रॅप पद्धत
अलिकडे दहा-पंधरा वर्षापासून आता आधूनिक अशा “कॅमेरा ट्रॅप” पद्धतीचा अवलंब संपूर्ण देशात व्याघ्र गणनेसाठी सुरु करण्यात आला. जंगलांमध्ये वाघाच्या किंवा वन्यजीवांच्या अनेक संचार मार्गावर किंवा अरण्यातील पाणवठ्यावर आधुनिक पद्धतीचे सेंसेटिव्ह कॅमेरे बसविण्यात येतात. कॅमेरामध्ये येणाऱ्या वाघाच्या दोन्हीही बाजूने छायाचित्र येईल अशा अँगलने ते बसविण्यात येतात. हे कॅमेरे दिवस-रात्र सुरु असतात. त्यानंतर कॅमेरात ट्रॅप झालेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करुन त्यात वाघाचा आकार, शरीरावरील पट्टे, दोन पट्ट्यातील अंतर, त्याचा आकार इ.चा अभ्यास केल्या जातो. एका अरण्यक्षेत्रात सारख्या दिसणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांची विभागणी करुन त्याचा बारकाईने अभ्यास करण्यात येतो. या सर्व बाबींचा तपशील गोळा करुन त्याचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करुन प्रत्येक वनक्षेत्रातील वाघांची संख्या काढली जाते. एकाच व्याघ्र प्रकल्पातील अशा अनेक क्षेत्रातील वाघांची संख्या मिळून त्या व्याघ्र प्रकल्पात किंवा अभयारण्यात किती वाघ आहे याचा आकडा तयार करण्यात येतो. देशातील अशा सर्वच व्याघ्र प्रकल्पात एकाचवेळी ही “कॅमेरा ट्रॅप पद्धती” अवलंबिण्यात येत असून संबंध देशात किती वाघ शिल्लक आहेत याची एकूण संख्या काढली जाते. अशा पद्धतीने वाघाच्या संख्येवरुन त्या त्या व्याघ्र प्रकल्पाची समृद्धता लक्षात येते. एखाद्या व्याघ्र प्रकल्पात मागील प्रगणनेपेक्षा कमी संख्या असल्यास त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येऊन वाघांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि हीच वाघांची संख्या सारखी असल्यास किंवा वाढली असल्यास त्याचे संवर्धन आणि संरक्षण यावर आहे त्यापेक्षा अधिक चांगला भर देण्यात येतो. व्याघ्रगणनेत हजारो अधिकारी, कर्मचारी, निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमी इ.मंडळी कार्यरत असतात.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात ४ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३,०७,७१३ चौरस किलोमीटर असून ६१,९३९ चौरस किलोमीटर क्षेत्र वनाच्छादित आहे. जवळपास २० टक्के क्षेत्र हे जंगलव्याप्त आहेत. त्यात सहा राष्ट्रीय उद्याने, ३६ अभयारण्य १५,७३२ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरले आहे. राज्यात ४ टायगर रिझर्व्ह असून मेळघाट जि.अमरावती, पेंच जिल्हा.नागपूर, ताडोबा-अंधारी जिल्हा चंद्रपूर आणि राधानगरी-कोयना कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत. २०११ च्या व्याघ्र गणनेत महाराष्ट्रात १६९ वाघ असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
१८५५ मध्ये लार्ड डलहौसीने अरण्य रक्षणाकरिता काही नियम केले. हे धोरण अतिशय उपयुक्त असले तरी “शिकार” हा ब्रिटिशांचा शौक असल्याने त्यांनी फार मोठ्या प्रमाणात वन्यजीव ठार केले. वाघांच्या शिकारीचे परवाने दिले. दोन वाघ आणि दोन सांबर मारण्याचा परवाना असतांना प्रत्यक्षात मात्र पाच ते सहा वाघांची शिकार करायचे. प्रत्यक्षात मात्र रेकॉर्डवर दोनच वाघांची शिकार केल्याचे दाखवायचे. १९२६ ते १९४७ या काळात देशात पंजाब आणि उत्तर प्रदेशात जंगल रक्षणाबाबतची जागरुक वाढली. १९५२ साली राखीव जंगलाबाबत कायदा अस्तित्वात आला आणि भारतातील एक तृतीयांश भागात पसरलेल्या जंगल संरक्षणाचे ध्येय ठेवल्या गेले. त्यानंतरच्या ५० वर्षात राखीव जंगलाबाबतची जागरुकता मोठ्या प्रमाणावर वाढली.
वाईल्ड लाईफ कॉन्झल्हेटिव्हा सोसायटीच्या अहवालानुसार आशियातील ४२ अधिवासांपैकी १८ अधिवास भारतात आहेत. उर्वरित अधिवास सुमात्रा बेटावर ८, पूर्व रशिया ६, थायलंड, बांगलादेश, लाओस येथे अधिवास आहेत. चीन, कंबोडिया, व्हिएतनाम येथे वाघाचा एकही अधिवास शिल्लक नाही.
वाघांबद्दल
जगात वाघाचे एकूण ९ प्रकार आहेत. त्यामध्ये बेंगाल टायगर, सायबेरियन, सुमात्रा, इंडो-चायना, मालायन, साऊथ चायना, जावा, बाली आणि कॅस्पीयन टायगर अशी त्यांची नावे आहेत. पैकी ऑस्कफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कॅस्पीयन वाघ व सायबेरियन वाघाचे डीएनए सारखेच असल्याचा शोध लावला आहे. भारतात असलेला वाघ हा “रॉयल बेंगाल टायगर” म्हणून ओळखला जातो.
वाघाचे आयुष्य १४ ते १६ वर्षे असते. नर वाघाचे वजन १९० ते २०० किलो, लांबी (शेपटीसह) ९ ते १० फुट असून वाघाच्या जबड्यात एकूण ३० दात असतात. कोणत्याही दोन वाघांचे पायाचे पंजे एकसारखे नसतात. वाघाच्या अधिवासाचे क्षेत्र २० ते ३५ चौरस किलोमीटर एवढे असते. मात्र वाघिणीचे अधिवास क्षेत्र १५ ते २० चौरस किलोमीटर एवढे असते.
जैवविविधता
पृथ्वीतलावर कोट्यवधी प्रकारच्या सजीवांच्या जाती-प्रजाती अस्तित्वात असाव्यात. मानवाला त्यातील फक्त १८ लाख प्रजाती ज्ञात आहेत. म्हणजे जगातील केवळ ९ ते १० टक्के जैवविविधता शास्त्रीयदृष्ट्या मानवाला माहित आहे. पृथ्वीवर जैवविविधतेने समृद्ध असे प्रमुख बारा देश असून भारत त्यापैकी एक आहे.
भारतात सुमारे १ लाख ३० हजार सजीवांच्या प्रजाती असून ४८ हजार प्रजाती वनस्पतींच्या, ८२ हजार प्रजाती प्राण्यांच्या आहेत. सर्वसाधारणपणे जगातील एकूण जैवविविधतेच्या ६.७ टक्के जैवविविधता भारतात आढळते. जगभरातील एकूण वनस्पती संपदेत ७.१ टक्के वनस्पती तर एकूण प्राणी प्रजातीपैकी ६.७ टक्के प्राणी प्रजाती आपल्या देशात वास्तव्य करतात.
समृद्ध पर्यावरणाचा प्रमुख आधार, जंगलाचा श्वास, असलेल्या राजबिंड्या वाघाला वाचविणे ही काळाची गरज आहे. नाही तर जगातील वाघांच्या संख्येचा गेल्या शतकाचा उतरता आलेख पाहिला तर एक दिवस हा वाघ पृथ्वीतलावरुन नाहीसा होईल. “वाघ” संपला तर सृष्टीच्या विनाशाची ती सुरुवात ठरेल. सृष्टीच नाही तर सजीवसृष्टी नाही. “मानव” हा सुद्धा संपलेला असेल. यासाठी प्रत्येकाने निसर्गाचा घटक समजून संबंध सजीवांचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला सन्मानाने वागविले पाहिजे. कारण या पृथ्वीतलावर राहण्याचा प्रत्येकाचा समान अधिकार आहे. आणि म्हणूनच “वाघ” वाचविण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. तरच तुमचं, आमचं आणि संबंध सजीवसृष्टीचं भवितव्य उज्वल आहे.
'वाघ नाहीसा झाला तर तो निर्माण करणं माणसाच्या हाती नाही. नाहीसा झालेला वन्यप्राणी जन्माला यायचा म्हणजे एक आकाश जाऊन दुसरं जन्माला यावं लागते.'
(MPSC परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे हायलाइट केले आहेत.)
Source: 'महान्यूज'
No comments:
Post a Comment