Savitribai Phule
Savitribai Phule |
महिला शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक श्रीमती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्म दिवस तर 10 जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिन ! त्यांचा जन्मदिवस दरवर्षी स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्यांच्या 10 मार्च या स्मृतिदिनी विविध उपक्रम आयोजित करून सावित्रीबाईच्या कार्याची स्मृती जोपासली जाते त्यांच्या स्मृत्यार्थ विविध कल्याणकारी योजना शासनाने राबविल्या आहेत. सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिली शिक्षिका व शिक्षणतज्ज्ञ, स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या, पदलिताच्या पहिल्या कैवारी, प्रौढ शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या, विधवांचा आधार, म्हणून गौरविले जाते.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्हातील शिरवळ नजीकच्या नायगाव या खेडयातील एका गरीब शेतकरी कुटूंबात झाला. शिक्षणाची परंपरा किंवा संस्कार नसलेल्या अशा घराण्यात जन्मलेल्या सावित्रीबाईचे शिक्षणक्षेत्रातील कर्तृत्व वाखाण्याजागे आहे.दिडशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जे विधायक कार्य केले त्याकार्याची नोंद आज सर्व समाजाने जाणीव पूर्वक घेणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील मुलींसारखे सावित्रीबाईचे बालपण गेले. बालवयातच त्यांचे लग्न झाले. सासरी आल्यावर सर्वसामान्य गृहिणी सारखाच त्यांचा दिनक्रम असायचा. सावित्रिबाईनी लग्नानंतर शिक्षण घेतले व आयुष्याच्या अखेरपर्यंत शिक्षण व समाज सुधारणेंच्या कार्याला वाहून घतले. ज्या काळात महिलांनी शिक्षण घेणे हे पाप मानले जाई. त्या काळात निरक्षर असलेल्या सावित्रीबाईनी प्रथम आवश्यक तेवढे शिक्षण घेतले आणि तया आद्य महिला शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापिका, समाजसेविका, दीनदलितांच्या उध्दारक आणि ज्योतिरावांच्या मृत्युनंतर सत्यशोधक समाजाच्या नेत्या झाल्या. शिक्षण क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रात पर्दापण करुन समाजाची सेवा करावी ही त्यांची आंत्यतिक ओढ होती.
शेतावर काम करतांना जेवणानंतरच्या विश्रांतीच्या काळात आंब्याच्या झाडाखाली ज्योतीरावांनी सावित्रीबाई व आपली मावस बहिण सगुणाबाई यांना प्राथमिक धडे दिले. 1847 साली त्या शिक्षिका म्हणून प्रसिध्द झाल्या. महात्मा ज्योतीबांनी मुलींसाठी चालू केलेल्या भिडे वाडयातला शाळेत सावित्रीबाई विना वेतन शिक्षिकेचे काम केले. त्या काळी शिक्षिकेचे काम करणे सोपी गोष्ट नव्हती. मुलींना शिकविण्याचे काम आणि तेहि एक महिला करते हे तत्कालिन समाजाला मानवण्यासारखे नव्हते. सावित्रीबाईचा छळ सुरू झाला. त्या शाळेत जावू लागल्या की त्यांना लोक खडे मारत, शिव्या देत, वेळप्रसंगी शेणाचे गोळे अंगावार फेकत, चारित्र्याबद्दल संशय घेत पण हा सगळा छळ शांतपणे सोसून सावित्रीबाईंनी आपले शिकविण्याचे कार्य अखंडपणे पुढे चालू ठेवले. शाळेत येणाऱ्या मुलींना अशाच त्रासाला सामोरे जावे लागत असे. पण वेळोवेळी पालकांना भेटून त्यांना समजाविण्याचे काम सावित्रीबाई करीत. त्यामुळे शाळेतील मुलींच्या संख्येत भर पडली. 1852 पर्यंत पुणे व आसपासच्या भागात मिळून फुले दांपत्य यांनी एकूण 18 शाळा उघडल्या व महिला शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाईनी केवळ शिक्षिकेचेच काम करतांना शिक्षण क्षेत्रातील अनेंक मुलगामी विचार आपल्या अनुभवातुन मांडले.
स्त्रीमुक्तीच्या आद्य प्रवर्तक सावित्रीबाई वाट चुकलेल्या महिला, विधवांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह काढून त्या थांबल्या नाहीत तर महिलांनी स्वावलंबी बनविण्यासाठी लहान सहान कार्य सुरू केले. बालपणी पित्याच्या धाकात, तरुणपणी पतीच्या धाकात व म्हातारपणी पुत्राच्या धाकात अशीच महिला राहीली पाहिजे, ती स्वंतत्र्य राहण्यास, स्वतंत्र्यपणे विचार करण्यास पात्रच नाही अशा विचारसरणीच्या समाजात महिलाची सामाजिक स्थिती सुधारायची असेल तर आधी महिला शिकली पाहिजे व त्याच बरोबर तिला स्वावलंबी बनविले पाहिजे असा केवळ विचार त्यांनी केला नाही तर तो अमलात आणण्याचे सर्वप्रथम कार्य सावित्रीबाईनी सुरु केले. एक प्रकारे सावित्रीबाई या "स्त्री मुक्ती लढयाच्या आद्य प्रवर्तक आहेत " असे म्हटले पाहिजे.
सावित्रीबाईनी एका अनौरस बालकाला दत्तक घेतले. त्याला चांगले शिक्षण दिले व डॉक्टर केले. सावित्रीबाईच्या कार्याचे मुल्यमापन केले असता त्याचे द्रष्टेपण तीव्रतेने जाणवते. आज महिला शिकून निरनिराळया क्षेत्रात नोकरी करताना दिसतात. अशा वेळेस ग्रामिण भागातील महिलांची संख्या नगण्य न राहता त्यात वाढ होणे काळाची गरज आहे. त्यामुळे काही मुठभर महिंलाच्या शिक्षणावरून किंवा त्यांच्या कार्यावरुन भारतातील महिला जागृत झाल्या किंवा मुक्त झाल्या असे मानता येणार नाही.
महिला शिक्षणाबद्दल आणि एकंदरीतच स्त्रीमुक्तीबद्दल पुरूष व महिला या दोन्ही घटकांनी आस्था दाखविणे गरजेचे आहे. म्हणून सावित्रीबाईच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन देशातील खेडयापाडयातील दीनदुबळया महिला जेव्हा साक्षर होतील, जागृत होतील, स्वावलंबी बनतील त्याचवेळी सावित्रीबाई फुले यांचे खऱ्या अर्थाने कार्य पूर्ण होईल.
Source: 'महान्यूज'
No comments:
Post a Comment