महत्वाच्या पोस्ट

दादासाहेब फाळके

Dadasaheb Phalke 

Dadasaheb Phalke 

भारतीय सिनेसृष्टीचे शिल्पकार


30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे जन्मलेल्या धुंडीराज ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी 3 मे 1913 रोजी भारतीय सिनेसृष्टीचा भरभक्कम पाया रोवला आणि हजारों कोटींच्या या सिनेउद्योग जगताचे ते शिल्पकार झाले.

आता या ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि एक शतकी परंपरा या व्यवसायास लाभली आहे. एका मराठी माणसाने सुरु केलेला हा व्यवसाय 100 वर्षात संपूर्ण भारतात रुजला, रुळला असून लाखो कुटूंब या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची महती सर्वांना व्हावी यासाठी हा लेख.....

दादासाहेबांना भारतीय चित्रसृष्टीचे जनक म्हटले जाते. कारण त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट निर्माण केला असून 3 मे 1913 रोजी मुंबई येथील कॉरनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित केला. दादासाहेब ऊर्फ धुंडीराज गोंविंद फाळके यांचे नाव या एका घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आणि भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली.

साधारणपणे नाताळचा काळ असावा. मुंबईच्या सँडहर्स्ट रोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरु होता. अनेक प्रेक्षक उत्सुकतेने हा चित्रपट पहात होते. त्यामध्ये दादासाहेब फाळके हे देखील होते. परंतु चित्रपट पाहताना त्यांच्या मनात विचारांचे काहूर उठले. चित्रपटातील प्रसंग पाहून त्याचे मन कावरेबावरे झाले आणि त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण- महाभारताशी करु लागले. चार-पाच वेळा त्यांनी लाईफ ऑफ ख्राईस्ट पाहिला आणि आपणही चित्रपट क्षेत्रात प्रवेश करायचा असा ठाम निर्धार त्यांनी केला. याच ठिकाणी भारतीय चित्रपटसृष्टीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.

राजा हरिश्चंद्र 


राजा हरिश्चंद्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाने एक नवा इतिहास घडविला. भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. एक तासाचा हा चित्रपट तयार होण्यास जवळपास आठ- नऊ महिन्यांचा कालावधी लागला होता. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका स्वत: दादासाहेबांनी केली होती, तर तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरुष कलावंताने व राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांचा मुलगा भालचंद्र याने साकारली होती. अत्यंत कठोर परिश्रमातून तयार झालेल्या या चित्रपटाने प्रचंड यश, किर्ती व पैसा मिळवला आणि त्यातूनच भारतीय चित्रपटसृष्टीची वैभवशाली परंपरा सुरु झाली. वयाच्या चाळीसाव्या वर्षी एका नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून दादासाहेबांनी चित्रपटनिर्मितीचे कार्य सुरु केले.

तंत्र आत्मसात केले


चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा त्यांनी प्रथम अभ्यास केला. केवळ तीन तासांची झोप आणि अविरत अभ्यास, ध्यास याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झाला. डॉक्टरांनी सावधनतेचा इशारा दिला तरीदेखील त्याची पर्वा न करता त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले. चित्रपटनिर्मितीच्या जोशाने भारावलेल्या फाळकेनी लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचे तंत्र समजावून घेणे, निर्मितीसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री आणणे यासाठी आपली विमा पॉलिसी गहाण ठेवली. 1 फेब्रुवारी 1918 रोजी ते लंडन येथे तत्कालीन सुप्रसिध्द चित्रपट निर्माते सेसिल होपवर्थ यांच्या वाल्टन येथील स्ट़ुडिओत चित्रपट निर्मितीची प्रक्रिया आत्मसात करुन फाळके हिंदुस्थानात परतले.

विविध चित्रपटांची निर्मिती


राजा हरिश्चंद्र चित्रपटानंतर दादासाहेबांनी आपला स्टुडिओ नाशिक येथे स्थलांतरित केला. त्या ठिकाणी मोहिनी भस्मासूर व सावित्री सत्यवान हे चित्रपट निर्माण केले. चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच आणखी अत्याधुनिक यंत्रसामग्री तसेच चित्रपटांच्या प्रिंट काढणारी मशिनरीची त्यांना गरज भासू लागली. यासाठी 1914 साली दादासाहेब पुन्हा इंग्लडला गेले आणि याच काळात पहिले महायुध्द सुरु झाले. लंडनमध्ये फाळके यांनी त्यांचे मित्र केर्बान यांना आपले चित्रपट दाखविले. या चित्रपटाने प्रभावित होऊन केर्बान यांनी फाळके यांना लंडनमध्ये चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी देऊ केली होती. परंतु फाळके यांनी त्यास विनम्रपणे नकार दिला. अनेक संकटांना तोंड देत दादासाहेबांची चित्रपटनिर्मिती सुरुच होती. 1932 साली बोलपटाचा जमाना आला आणि दादासाहेबांनी सेतुबंधन या मूकपटाचे डबिंग करुन तो बोलपट बनवला. तसेच 1917 मध्ये लंकादहन या चित्रपटाची निर्मिती केली. लंकादहनने त्या काळातील चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले. तद्नंतर त्यांनी How fillms are made (1917), श्रीकृष्ण जन्म (1918) कालियामर्दन (1919) भक्त प्रल्हाद (1926) हे अविस्मरणीय चित्रपट निर्माण केले.

दरम्यान मूक चित्रपटाचा जमाना संपून बोलपटाचे युग सुरु झाले होते. कोल्हापूर सिनेटोन कंपनीसाठी दादासाहेबांनी 1937 साली गंगावतरण हा चित्रपट दिग्दर्शित केला. हाच चित्रपट दादासाहेबांचा शेवटचा चित्रपट ठरला.

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेबांचा अंतिम काळ तसा कष्टदायक गेला आणि 16 फेब्रुवारी 1944 रोजी या महान व्यक्तिमत्वाचा नाशिक येथे अंत झाला.

‘प्रतिष्ठेचा फाळके पुरस्कार’


दादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ अत्यंत मानाचा प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारने दादासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त सन 1969 पासून सुरु केला. पहिल्या पुरस्काराच्या मानकरी देविकारणी ठरल्या. चित्रपटसृष्टीतील पृथ्वीराज कपूर, रुबी मायर्स (सुलोचना), नितीन बोस, सोहराब मोदी, नौशाद, दुर्गा खोटे, सत्यजीत रे, व्ही. शांताराम, राज कपूर, एल.व्ही.प्रसाद, ऋषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, भूपेन हजारिका, मजरुह सुलतानपुरी, गीतकार प्रदीप, डॉ. राजकुमार, दादामुनी अशोककुमार, गान सम्राज्ञी लता मंगेशकर, दिलीपकुमार, शिवाजी गणेशन, बी.आर. चोप्रा, यश चोप्रा, देव आनंद, मृणाल सेन, अदूर गोपालकृष्णन, बी.एन. सिरचार निर्माते, पंकज मलिक, बी.एन. रेड्डी, धिरेंद्रनाथ गांगुली, कानन देवी, रायचंद बोराट, बी. नागी रेड्डी, आशा भोसले, जयराज , ए नागेश्वर राव, शाम बेनेगल, तपन सिंन्हा, मन्नाडे, व्ही. के. मुर्ती, डी. रामा नायडू, के. बालचंदर आदी विभूतींना हा पुरस्कार मिळाला असून यंदा हा पुरस्कार चरित्र अभिनेते खलनायक प्राण यांना जाहीर.

चित्रपटसृष्टीतील अतुलनीय व महत्वपूर्ण योगदानाबदृदल ज्या विभुतींना हा पुरस्कार मिळाला आहे आणि यापुढेही ज्यांना हा पुरस्कार मिळेल त्या सर्वांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा.

(MPSC परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे हायलाइट केले आहेत.)


Source: 'महान्यूज'


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.