Balshastri Jambhekar
Balshastri Jambhekar |
आज या घटनेला 182 वर्षे पूर्ण झाली. आपण ‘दर्पण दिन’ म्हणून 6 जानेवारी साजरा करतो. या निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या महान कार्याची महती सांगणारा हा लेख...
1832 चा काळ इंग्रजांच्या अधिपत्याचा होता आणि या काळात समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. म्हणूनच तत्कालिन पार्श्वभूमीवर एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रींना वाटले आणि त्यांनी ‘दर्पण’ या पाक्षिकाची मुंबईत सुरुवात केली. मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्पण प्रकाशित होत होते. लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन बाळशास्त्रींनी `दर्पण` सुरु ठेवले याची साक्ष म्हणजे त्यांनी या वृत्तपत्रात कुठेही जाहिरात छापली नाही. स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र त्याकाळी सुरु ठेवले यातूनच वृत्तपत्राचा हेतू स्पष्ट होतो.
कोकणांतील पोंभुर्ले यागावी जन्म आणि तद्नंतर मुंबईतील वास्तव्य, शिक्षण, शिक्षणातील अडीअडचणी, त्यावर केलेली मात. दर्पण दिनदर्शिकेचे प्रकाशन व्यावसायिक अडचणी असा खडतर प्रवास बाळशास्त्री यांनी केला. वडील गंगाधरशास्त्री हे पंडित तर आई सगुणाबाई धार्मिक आणि धर्मपरायणवादी. त्यांचाच वारसा बाळशास्त्रींना मिळाला. 1824 च्या सुमारास पोंभुर्ले सोडून बाळशास्त्री मुंबईत आले. त्यांच्या भगिनीचे म्हणजे लाडूबाईचे यजमान रामशास्त्री जानवेकर हे (दी बॉम्बे नेटिव्ह स्कूल सोसायटी) शाळेचे तपासनीस होते. त्यांच्याकडे बाळशास्त्रींची निवास व्यवस्था झाली.
न्यायमूर्ती ना.ग.चंदावरकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल म्हटले आहे की, `बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते. न्यायमूतींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे. केवळ वृत्तपत्रांद्वारे शैक्षणिक कार्य त्यांनी केले. वृत्तपत्रांसारखे माध्यम आणि त्याची बिकट वाट हे गणित बाळशास्त्रींनी चांगलेच जमविले. त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग त्यांनी करुन घेतला आणि समाजप्रबोधनासाठी दर्पणची ठिणगी तेवत ठेवली. 25 जून 1840 साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पणच्या माध्यमातुन त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे मासिक इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले.
ग्रंथसंपदा आणि सन्मान
1834 साली भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला आणि 1845 साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले.बाळशास्त्रींनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल, इतिहास, भौतिक शास्त्र, गणित, खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याचबरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नितीकथा हे चार ग्रंथ लिहिले आहेत.
एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानांच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. ‘हिंदुस्थानचा प्राचीन’ इतिहास हा ग्रंथ 1851 साली त्यांच्या निधनानंतर प्रसिध्द झाला.
बाळशास्त्रींना देशी व विदेशी नऊ भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत, बंगाली, कन्नड, ग्रीक, लॅटीन आदी भाषांचा त्यांचा अभ्यास होता. आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. दादाभाई नवरोजी हे आचार्य बाळशास्त्रांचे विद्यार्थी होते.
बाळशास्त्रींच्या कार्याबद्दल डॉ. वि.ल. धारुरकरांनी म्हटल्याप्रमाणे बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते. त्याच सोबत त्यांना आद्य प्राध्यापक संबोधिले जाते. त्यांचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणार आहे.
(संदर्भ: पत्रकारितेचा दीपस्तंभ : आचार्य बाळशास्त्री जांभेकर –डॉ- वि.ल. धारुरकर)
No comments:
Post a Comment