महत्वाच्या पोस्ट

मराठी भाषेची उत्पत्ती

Origin of Marathi Language


कोणत्याही भाषेच्या निर्मितीचा विचार करताना आपल्याला (१) ती भाषा केव्हा निर्माण झाली, (२) ती कोणत्या भाषेपासून निर्माण झाली (३) तिच्या उत्पत्तीची कारणे काय असावीत (४) आणि हे सर्व ठरवण्यासाठी कोणत्या साधनांचा आधार घेता येईल या चार गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. मराठी भाषेच्या उत्पत्तीचा काळ ठरवण्यासाठी आपल्याला (१) त्या भाषेतील लिखित वाङ्मय (२) त्या भाषेतील लोकवाङ्मयाची परंपरा (३) त्या भाषेसंबंधी इतर भाषांमधील उल्लेख आणि त्या भाषेत लिहिले गेलेले कोरीव लेख म्हणजे शिलालेख आणि ताम्रपट या साधनांचा आधार घ्यावा लागेल.

मराठीच्या उत्पत्तीकाळातील वाङ्मय : 

मराठीचे भाग्य असे की तिच्या अगदी प्रारंभीच्या काळीच तिच्यात ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र यासारखे उत्कृष्ट ग्रंथ निर्माण झाले. यातील लीळाचरित्र हा ग्रंथ १२८४ इ.स. मध्ये निर्माण झाला तर ज्ञानेश्वरी १२९० मध्ये लिहिली गेली. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात अशा श्रेष्ठ ग्रंथांची निर्मिती झाली याचा अर्थ मराठी भाषा त्या काळात चांगलीच परिपूर्ण सक्षम आणि प्रगल्भावस्थेत होती. ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वी साहजिकच ३००-४०० वर्षांच्या काळ लोटला पाहिजे. याच काळात महदंबेचे धवळे, गोविंदप्रभू चरित्र यासारख्या अनेक ग्रंथांचीही रचना झाली. मराठीतील आद्य लोकवाङ्मयाचा विचार करताना लीळाचरित्र, दृष्टांतपाठ यासारख्या ग्रंथातील कथांची आठवण होते. त्याहीपूर्वी इ.स.११२९ मध्ये चालुक्य नृप सोमेश्वराने लिहिलेल्या ग्रंथात `मानसोल्लास` अथवा `अभिलषितार्थ चिंतामणी` या ग्रंथात महाराष्ट्रातील स्त्रिया कांडताना ज्या ओव्या म्हणत असत त्या उद्‌धृत केल्या आहेत त्या अशा ...
`` जेणे रसातल उण मत्स्यरुपें वेद आणियले /
मनुशिवक वाणियले /
सो संसार सायर तारण
मोहंतो रावो नारायण ``
(अर्थ : ज्याने रसातलातून मत्स्यरुपाने वेद आणले, मनु-शिव वर्णिले, तो संसार सागर तारक मोह (अज्ञान) दूर करणारा राजा नारायण) यावरुन बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात अशा प्रकारचे लोकवाङ्मय निर्माण होऊ लागले होते असा निष्कर्ष निघतो. हे मराठीच्या त्याकाळातील अस्सल पुरावे असले तरी याहूनही दुसऱ्या प्रकारच्या लिखित वाङ्मयाची परंपरा मराठीला आणखी मागच्या काळात नेऊन सोडते. ती म्हणजे कोरीव लेखांची परंपरा. कोरीव लेखांमध्ये शिलालेख आणि ताम्रपट यांचा समावेश होतो. असे बरेच कोरीव लेख उपलब्ध असल्याने स्थलाभावी येथे उद्धृत करता येत नाहीत. फक्त त्यांतील काही महत्त्वाच्या लेखांचा निर्देश करता येईल. पण ते मराठी भाषेतील कोरीव लेख आहेत, हे लक्षात घ्यावे.


  • इ.स. १२८९ उनकेश्वरचा शिलालेख (मराठवाडा)
  • इ.स. १२८५ पूरच शिलालेख (सासवडजवळ)
  • इ.स. १२७३ पंढरपूरचा चौऱ्याऐंशीचा शिलालेख
  • इ.स. १२३९ नेवासे येथील शिलालेख (नगर जिल्हा)
  • इ.स. १२२८ खोलेश्वराचा शिलालेख (आंबेजोगाई, जि.बीड)
  • इ.स. १२०६ पाटण येथील शिलालेख (खानदेश, जळगाव)
  • इ.स. ११८७ परळ येथील शिलालेख (मुंबई)
  • इ.स. ११६४ सावरगावचा शिलालेख (ता.तुळजापूर, उस्मानाबाद)
  • इ.स. ११५७ पळसदेवचा शिलालेख (ता.दौंड, जि.पुणे)
  • इ.स. १०६० दिवे आगरचा ताम्रपट (कोकण)
  • इ.स. ९८३ श्रवणबेळगोळचा शिलालेख (कर्नाटक)


शेवटचा श्रवणबेळगोळचा शिलालेख इ. १०९५ असावा असे मत आता प्रस्थापित झाल्यामुळे त्या अगोदचा दिवे आगरचा ताम्रपट हा मराठीतील आद्य कोरीव लेख ठरतो. त्यावरुन ज्ञानेश्वरीच्या पूर्वी जवळजवळ ३०० वर्षे मागे आपल्याला मराठीचे अस्तित्व दिसते.

याहीपलीकडे मराठीच्या अस्तित्वाचे पुरावे अन्य भाषातील मराठीविषयक निर्देशाचे आहेत. इ.स. ८५९ मध्ये लिहिलेल्या धर्मोपदेशमाला ग्रंथात मराठीचे वर्णन पुढील प्रमाणे केलेले आहे.

सललियपयसंचारा पयडियमयणा सुवण्णरयणेल्ला मरहठ्ठय भासा कामिणी य अडवीय रेहंती... यात मराठीची तुलना सुंदर स्त्रीशी आणि अरण्य यांच्याशी केली असून श्लिष्ट शब्दांच्या आधारे ती सुंदर शब्द असलेली शृगांररसानुकूल आणि सुंदर नादमय वर्णांनी युक्त आहे असे म्हटले आहे. यापूर्वीचा ग्रंथगत उल्लेख म्हणजे इ.स. ७७८ मध्ये लिहिलेल्या उद्योतनसूरीच्या कुवलयमाला या ग्रंथातील मराठे आणि त्यांची भाषा यांचे वर्णन असलेले सुप्रसिद्ध वाक्य होय.
``दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य / दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे // `` (बळकट, ठेंगण्या, सावळ्या अंगाच्या, काटक अभिमानी, भांडखोर, दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असे बोलणाऱ्या मराठी लोकांस त्याने पाहिले) आपल्याला ज्ञात असलेले हेच मराठीचे पहिले वाक्य होय. या पुराव्यांच्या आधारे मराठीचा उत्पत्तिकाल इसवी सनाचे आठवे शतक आहे, असे निश्चितपणे म्हणता येते.

मराठीची उत्पत्ती कोणत्या भाषेपासून झाली याबद्दलचे बरेच मतप्रवाह आहेत. त्यासंदर्भात वैदिक भाषा, संस्कृत भाषा, पाली भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, महाराष्ट्री अपभ्रंश इ. भाषांचे दावे पुढे करण्यात आले आहेत. मराठीची जनकभाषा तिला कालदृष्ट्या निकटची असली पाहिजे. ती केवळ शब्दसंग्रहापुरती मर्यादित नसून तिच्यात ध्वनिप्रक्रिया उच्चारण प्रक्रिया व्याकरण शब्दसंग्रह इत्यादी बाबी मराठीला जवळच्या असल्या पाहिजेत या निकषांवर महाराष्ट्री अपभ्रंश हीच मराठीची साक्षात जनकभाषा ठरते. वरील भाषांखेरीज तमिळ, कन्नड इ. अन्य प्रान्तीय भाषांशाही मराठीचे नाते सांगण्यात आले आहे. पण हे साम्य काही शब्दांपुरतेच मर्यादित असल्याने त्यांना मराठीच्या जनकत्वाचा मान मिळणे शक्य नाही महाराष्ट्री अपभ्रंश हीच मराठीची साक्षात जननी आहे असे डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी साधार सिद्ध केले आहे.

Source: 'महान्यूज'

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.