Vasantrao Naik
Vasantrao Naik |
वसंतराव नाईकांचे जीवनदर्शन
आजूबाजूला पर्वतांच्या रांगा, दाट वृक्षराजी आणि झुळझुळ वाहणारा एक मोठा ओढा, अशा निसर्गरम्य ठिकाणी गहुली हे गांव वसले आहे. या गावातच 1 जुलै 1913 रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. हे गांव त्यांचे आजोबा चतुरसिंग नाईक यांनी वसविले आहे. तांड्याच्या प्रमुखाला नाईक म्हणतात. त्यांच्या सल्ल्याने गावाचा कारभार चालतो. वंशपरंपरेने गावाची नायकी वसंतरावांचे वडील फुलसिंग नाईकांकडे आली.
बंजारा ही जात मूळची राजस्थानातील असून ती राजपूत-क्षत्रीय आहे. कालांतराने हे राजपूत-क्षत्रीय व्यापारी बनून वंजेला जाऊ लागले. वंज हा वाणिज्य या शब्दाचा अपभ्रंश आहे. वंजेला जाताना हे लोक टोळया करुन जात असत व बैलाच्या पाठीवरुन व्यापरी माल इकडून तिकडे व तिकडून इकडे पोचवित असत. व्यापाराच्या वस्तू व माल सुरक्षित राहाव्या म्हणून ते गांवापासून दूर टेकड्याच्या पायथ्याशी थांबत असत. दळणवळणाचे साधन म्हणून देशात रेल्वे आली. परिणामी बंजाराचा तांडा स्थिरावला.
फुलसिंग नाईक हे श्रीमंत होते परंतु गावात शिक्षणाची सोय नव्हती. चार वर्गासाठी चार गावे त्यांना बदलावी लागली. पहिलीचे शिक्षण पोहरा, दुसरी उमरी, तिसरी बान्सी व चौथीचे शिक्षण भेजला या गावाला जाऊन पूर्ण केले. पुढचे शिक्षण विठोली व अमरावती येथे झाले. मॅट्रीकसाठी नागपूरच्या नील सिटी हायस्कूलमध्ये आले.
हायस्कूलमध्ये असतानाच त्यांचा वाचनाचा व्यासंग वाढला होता. महात्मा फुले यांच्या जीवनाचा व त्यांच्या बहुजन सुखाच्या कार्याचा परिणाम त्यांच्या मनावर होऊ लागला होता. बी.ए. पदवीपर्यंतचे शिक्षण नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून तर कायद्याचे शिक्षण विद्यापीठातून पूर्ण केले.
1940 मध्ये त्यांनी पुसद येथे वकिली सुरु केली. दरम्यान 6 जुलै 1941 रोजी घाटे घराण्यातील वत्सलाताईंशी आंतरजातीय विवाह झाला. अल्पावधीतच त्यांनी चांगला वकील म्हणून नावलौकीक मिळविला. वकीलीच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केले. त्यांची राजकीय कारर्कीद सर्वश्रुत आहे. अकारा वर्षापेक्षा अधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहून त्यांनी राज्याची सेवा केली. शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग, सिंचन आदी क्षेत्रात महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानी नेले. मात्र ते ज्या भागातून व ज्या समाजातून आले, त्यांची जडणघडण कशी झाली, हे पाहणे महत्वाचे आहे.
त्याकाळात पुसद तालुका व बंजारा समाज अतिमागासलेला होता. समाजाचे काही देणे लागते या जाणिवेतून त्यांनी केलेल कार्य शब्दातीत आहे. वकीली व्यवसाय करीत असताना त्यांनी अंधश्रद्ध, मद्यप्राशन, सावकारी या जोखंडातून बाहेर पडण्यासाठी समाजामध्ये जनजागृती केली. त्या काळात त्यांनी श्रमदानातून 12 गावांच्या रस्त्यांची दुरुस्ती केली. चांगला वकील म्हणूनच नव्हे तर ग्राम सुधारणेच्या कामामुळे त्यांनी नावलौकीक मिळविला. सार्वजनिक कार्यामुळेच अनेक मानाची पदे त्यांच्याकडे चालत आली. 1943 मध्ये ते पुसद शेतकी संस्थेचे तर 1947 मध्ये पुसद येथील हरिजन छात्रालयाचे ते अध्यक्ष झाले तसेच दिग्रस येथील राष्ट्रीय मोफत छात्रालयाचेही ते अध्यक्ष होते. त्यानंतर 1951-52 मध्ये मध्यप्रदेश को-ऑपरेटिव्ह सेंट्रल बँकेचे डायरेक्टर म्हणून त्यांची निवड झाली. दरम्यान 7 ऑक्टोबर 1946 मध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. मतदारांमधून ते या पदावर निवडून गेले.
दर्याखो-यात विखुरलेल्या बंजारा समाजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने त्यांनी 30 व 31 जानेवारी 1953 रोजी अखिल भारतीय बंजारा युवक परिषद आयोजित करुन तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांना निमंत्रित केले होते. त्यानंतर 1955 मध्ये चाळीसगांव येथे परिषद घेतली. विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून दिग्रस येथे बंजारा वसतिगृह सुरु केले. परिसरातील मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षणाची सोय नव्हती. आपले पिताश्री फुलसिंग नाईक यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, परंतु त्यांना शिक्षणाची आवड होती. म्हणूनच ते वसंतराव नाईकांना उच्च शिक्षण देऊ शकले. आपल्या पिताश्रीच्या नावाने त्यांनी पुसद येथे फुलसिंग नाईक महाविद्यालय सुरु केले. परिणामी त्या भागातील असंख्य तरुणांना शिक्षण घेता आले. त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोय केली.
भटक्या विमुक्त जातीजमातींना शिक्षण घेता येवा म्हणून नाईक साहेबांच्या काळात निवासी आश्रमशाळा सुरु करण्यात आली. मोफत राहण्याची व भोजनाची सोय झाल्यामुळे बंजारा समाजासह अन्य जाती-जमातीतील मुले शिक्षण घेऊ शकले. आज राज्यात भटक्या विमुक्तांच्या सातशेच्यावर आश्रमशाळा आहेत. याशिवाय या समाजासाठी तिसरी सूची निर्माण करुन शिक्षण व नोकरीमध्ये संधी दिली. तसेच आदिवासींसाठी क्षेत्रीय बंधन शिथील केले.
शैक्षणिक, औद्योगिक, कृषी आदी क्षेत्राचा विकास करतानाच त्यांनी सामाजिक विकासाकडे जाणिवपूर्वक लक्ष दिले. समाजाच्या व्यासपीठावर बोलताना ते म्हणयचे, “एकवेळ उपशी राहिले तरी चालेल, परंतु मुलांना शिकवा”. या अनुषंगाने औरंगाबादचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कर्मवरी शंकरसिंग नाईक आवठवण सांगतात, “माझे गांव औरंगाबाद जवळ होते. माझे शिक्षण चौथी पर्यंत झाले होते. शिक्षणाची आवड होती, परंतु पुढे शिकू शकलो नाही. 1965-66 ची घटना असेल. नाईक साहेब औरंगाबाद दौर्यांवर आले की, आम्ही त्यांना पाहण्यासाठी विमानतळावर जायचो. दूरुनच त्यांना पाहायला मिळायचे. पोलिस आम्हाला जवळपास जाऊ द्यायचे नाही. नाईक साहेबांच्या एकदा हे लक्षात आले. हे लोक दौर्या च्यावेळी नेहमी दिसतात. आमचा डोक्यावरचा बंजारा फेटा. त्यामुळे त्यांनी कलेक्टरला आम्हाला गेस्ट हाऊसवर घेऊन येण्याचे सांगितले. पोलिसाची गाडी आली आणि आम्हाला गाडीत बसविले. आम्ही घाबरुन गेलो. आपली चूक झाली. आपल्याला शिक्षा होणार, याची मनातून भीती वाटू लागली. गेस्ट हाऊसवर पोहचल्याबरोबर मुख्यमंत्र्यांसमोर आम्हाला उभे केले.
नाईक साहेबांनी अधिकार्यां्ना बाहेर जाण्याचे सांगितले. आम्हाला बसायला सांगितले. चक्क बंजारी भाषेत बोलू लागले.” आम्हाला धीर आला. आस्थेने चौकशी केली. समाजातील मुलांना शिकविण्यासाठी जनजागृती करा. शाळा सुरु करा, असा वडिलकीचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही कामाला लागलो. 1966 मध्ये औरंगाबादेत खोकडपुर्यांत बंजारा वसतिगृहाची सुरुवात केली. त्यानंतर शाळा सुरु केली. मुलं शिकली. आज मोठमोठ्या हुद्यावर ही मुलं आहेत. त्यांना बघून समाधान वाटते, ही केवळ नाईक साहेबांची प्रेरणा आणि आशीर्वाद होते, असे ते अभिमानाने सांगतात.
दुसरी आठवण प्राचार्य राजाराम राठोड यांच्यासंबंधाने सांगता येईल. राठोड सर उदगीर येथे प्राचार्य होते. आपल्या समाजातील एक तरुण शिक्षण क्षेत्रात एवढ्या मोठ्या पदावर आहेत, याचा नाईक साहेबांना आनंद झाला. त्यांना एके दिवशी बोलवून एखादे कॉलेज सुरु करण्याची ईच्छा प्रदर्शित केली. त्यानंतर राठोड सरांनी औरंगाबाद येथे त्यांच्या नावाने 1972 मध्ये महाविद्यालय सुरु केले. आज त्याच महाविद्यालयातून अनेक मुले उच्च विद्याविभूषित झाले आहेत. ठिकठिकाणी नोकरी करीत आहे
नाईक साहेबांची दूरदृष्टी ही विशाल होती. सामाजिक बांधिलकी आणि राज्याचा विकास त्यांनी केला. दौलतराव भोसले सारखा भटक्या विमुक्तांच्या कार्यकर्त्याला त्यांनी विधान परिषदेवर घेऊन वंचित घटकाला न्याय दिला, हे विशेष म्हणावे लागेल.
Source: 'महान्यूज'
No comments:
Post a Comment