महत्वाच्या पोस्ट

विदर्भ- वस्त्रोद्योग

Vidarbh- Suitable for the textile industry.  

Vidarbh-Suitable for the textile industry
Vidarbh- Suitable for the textile industry  

पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून विदर्भ प्रसिद्ध आहे. राज्याच्या एकूण कापूस उत्पादनापैकी 1/3 कापूस एकट्या विदर्भात होत असून हे उत्पादन दरवर्षी 6.2 मिलियन मेट्रीक टन एवढे उत्पादन आहे. कापसावर आधारित प्रक्रीया उद्योग तसेच कापड इंडस्ट्रीला पोषक असा हा प्रदेश आहे. सद्या देशभरात कापड उद्योग अतिशय भरभराटीचा असा उद्योग मानला जातो. विदर्भात होणाऱ्या ॲडव्हॉन्टेज विदर्भ या गुंतवणूकदाराच्या परिषदेच्या निमित्ताने विदर्भातील कापसावर आधारित उद्योगांना विकासाची संधी या निमित्ताने चालून आली आहे. 2012 मध्ये सरकारने नवीन  वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. यातही टेक्स्टाईल इंडस्ट्रिला पूरक अशा तरतूदी शासनाने दिल्या आहे. या निमित्ताने कापसाचे अर्थकारण समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात 80 लाख गाठीचे उत्पादन होत असून विदर्भाचा त्यातील वाटा तब्बल 60 ते 70 टक्क्याचा आहे. कापसाच्या किमान 40 ते 50 लाख गाठी विदर्भात उत्पादित होतात. यावरूनच विदर्भाला पांढऱ्या सोन्याची खाण म्हटल्या जाते. विदर्भातील नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. कापसावर आधारित उद्योगाला पोषक असे वातावरण विदर्भात आहे. 

400 जिनिंग प्रेसींग व 3500 पावरलुम्स विदर्भात आहेत. ही विदर्भासाठी जमेची बाजू आहे. ॲडव्हॉन्टेज विदर्भाच्या निमित्ताने येऊ घातलेल्या गुंतवणूकदारांना विदर्भात कापड निर्मिती उद्योग उभारण्यासाठी आकर्षित करणे हा उद्देश आहे. 2012 च्या नवीन वस्त्रोद्योग धोरणानूसार वस्त्रोद्योग क्षेत्रात 40 हजार कोटी रूपयाचे गुंतवणुकीचे लक्ष निर्धारीत करण्यात आले. त्यानूसार झिरो विंडो सिस्टम, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात नवीन टेक्स्टाईल युनिट स्थापनेला प्रोत्साहन व उद्योगांना 10 टक्के अनुदान या बाबी अंतर्भूत आहेत. याचा फायदा नव्या उद्योगांना निश्चितच होऊ शकतो. विदर्भातच टेक्स्टाईल झोन उभा करण्याचा या परिषदेचा उद्देश असणार आहे. जिनिंगप्रेसींग, सूतगिरण्या आणि कापडगिरण्यांच्या माध्यमातून उद्योगाबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मीती होऊ शकते.

भारत 

भारत हा वस्त्रोद्योग निर्मीती करणारा व निर्यात करणारा जगातील दूसरा क्रमांकाचा देश आहे. भारतात टेक्स्टाईल निर्मितीची अतिशय मजबूत अशी साखळी आहे. हे यश देशातील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्य बळाच्या भरवश्यावर होत आहे. विदर्भातही कुशल मनुष्यबळाची कमतरता नाही. महाराष्ट्र हा देशाच्या कापूस उत्पादनात 21.7 टक्के योगदान देणारे राज्य आहे. यातही विदर्भाचा वाटा मोठा असल्यामुळे टेक्स्टाईल इंडस्ट्रीला विदर्भात पोषक असे वातावरण आहे. विदर्भात कापसाची प्रत निर्यातीच्या क्षमतेची असल्यामूळे याठीकाणी जागतिक दर्जाचे ब्रॅन्ड उत्पादन होऊ शकते, ही बाब ॲडव्हॉन्टेज विदर्भ या परिषदेच्या माध्यमातून उद्योजकांना पटवून देण्याचा प्रयत्न होणार आहे.

मनुष्यबळ          

विदर्भात‍ शिक्षणाचे जाळे सुद्धा मजबूत आहे. विदर्भात 220 अभियांत्रिकी, 470 व्यवसायिक आणि 68 व्यवस्थापन संस्था कार्यरत आहेत. यातून वस्त्राद्योगला लागणारे कुशल मनुष्यबळ मिळू शकते. गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना त्यांचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची अत्यंत गरज असते. ही गरज  विदर्भ भागवू शकतो. सोबतच येथील युवक-युवतींना विदर्भातच रोजगार प्राप्त झाला तर त्यांची पहिली पसंती विदर्भच राहणार आहे.

गुंतवणूक 

विदर्भात 41 मोठी वस्त्रोद्योग व 4260 लघुद्योगाच्या माध्यमातुन 5500 कोटी रूपयांची गुंतवणूक झाली असून त्यातून 29000 रोजगार निर्माण झाला आहे. ही विदर्भातील वस्त्रोद्योग व्यवसायाचे यश म्हणावे लागेल. या आधारेच गुंतवणूकदारांना या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी विदर्भ पोषक वाटणार आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचा चांगला फायदा या उद्योगाला चालना मिळण्यासाठी होऊ शकतो. अमरावती, बुटीबोरी आणि नागपूर येथील एमआयडीसी मध्ये टेक्स्टाईम झोन तयार करण्यात आले आहे. ही जमेची बाजू असून या उद्योगासाठी  वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा एमआयडीसीचा प्रयत्न असणार आहे. रेमण्डस, इंडोरामा, इंडोवर्थ, मोरारजी, सूर्यलक्ष्मी, विशाखा, जिमटेक्स, पी. वी व मोहता यासारख्या जागतिक दर्जाच्या टेक्स्टाईल कंपन्यांनी विदर्भात यापुर्वीच गुंतवणूक केली असून या उद्योग समूहांनी विदर्भाच्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर पोहचविले आहे.

विदर्भातील वस्त्रोद्योग व्यवसायात ॲडव्हान्टेज विदर्भाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्यास येथील शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळू शकतो. सोबतच कापूस शेतीत नवनविन तंत्रज्ञान विकसित होण्यास वाव मिळू शकते. विदर्भ हा टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणून नावरूपास येण्याइतपत सक्षम असून या इंडस्ट्रीला लागणारा कच्चा माल विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. कापड उद्योग व निर्यात यासाठी लागणाऱ्या मूलभूत सोई पुरविण्यासाठी एमआयडीसीची तयारी सुद्धा आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग व्यवसायात ॲडव्हॉन्टेज विदर्भच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणे अपेक्षित आहे.

(MPSC परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे हायलाइट केले आहेत.)


Source: 'महान्यूज'


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.